top of page
Search

जुन्या करारातील शरणपूरांचे मर्म

लेखक: रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे

(डायरेक्टर फायर मिनिस्ट्री)


जुन्या करारातील शरणपूरे किंवा आश्रयांची नगरे – द सिटीज ऑफ रेफ्युज यांचे गूढ रहस्य


जुन्या करारात आपण पहातो, की, ज्याच्या हातून चुकून खून झाला  आहे, अशा व्यक्तीसाठी देवाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक विशिष्ठ योजना केलेली होती. शरणपूरे किंवा आश्रयाचे नगर किती योजना होती. जुन्या करारात, जर एखाद्या मनुष्याच्या हातून चुकून खून झाला; उदा - एकजण जंगलाकडे झाडाची फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला असेल, आणि फांदी तोडत असताना अचानक त्या कुऱ्हाडीच्या  दांडयातून ते कुऱ्हाडीचे फाळ किंवा लोखंडाचे पाते, निसटले, त्याचवेळी त्या झाडाखालून एखादी व्यक्ती जात असेल आणि कुऱ्हाडीचे पाते त्या व्यक्तीच्या डोक्यात पडून त्यास इजा होऊन ती व्यक्ती मरण पावली. तर काय होत होते ?


आता प्राचीन काळी डोळ्यासाठी डोळा, हातासाठी हात म्हणजे जीवाबद्दल जीव या पद्धतीने लोक सामाजिक जीवन जगत होते.


आजच्या काळात देखील एखाद्याने खून केला असेल तर खूनाबद्दल अपराधी व्यक्तीला फाशी दिली जाते, जीवाबद्दल जीव हे जे तत्व आहे ते इक्वालिटीचे किंवा समानतेचे तत्व आहे, ते सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये वापरले जाते. अर्थात व्यक्तिगतरित्या हे तत्व वापरू नका अशी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे.


प्राचीन काळी सूड घेण्याची व्याप्ती मर्यादेच्या पलीकडे होती. एका जीवाच्या बदल्यात शत्रू पक्षाकडून संपूर्ण घरादाराचा नाश केला जात होता. देवाने हे बंद केले. एका जीवाबद्दल दहा जीव घ्यायचे नाहीत, एका जीवाबद्दल एकच जीव. हा नियम देवाने घालून दिला. एका डोळ्याबद्दल एक डोळा एका जीवाबद्दल एक जीव हे समानतेचे किंवा इक्वलिटीचे तत्व जुन्या कराराच्या काळात सामाजिक न्याय व्यवस्थेसाठी देवाने लावून दिले आणि प्राचीन काळाच्या रानटी किंवा बारबॅरिक पद्धतीला आळा घातला. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर ज्याच्याकडून खून झालेला आहे, त्याच्या संपूर्ण घराण्याला उध्वस्त करून टाकीत असत. म्हणून ते बंद करण्यासाठी देवाने समान न्यायाचे तत्व प्रस्थापित करून सामाजिक न्यायव्यवस्था अमलात आणली. ज्याला इक्वल जस्टीस केव्हा इक्वलिटी असे आजच्या काळात नाव आहे.  एकाचा खून झाला त्याबद्दल एकच, ज्याने खून केला तोच जबाबदार त्याचे संपूर्ण घराणे जबाबदार नाही.


ज्याच्या हातून खून झालेला आहे त्याच्या मागे  सूड घेणारा म्हणजे ॲवेंजर खुनी  व्यक्तीच्या मागे धावत लागत असे.  या परिस्थितीत, ज्याच्याकडून चुकून खून झालेला आहे त्याच्यासाठी म्हणजेच खुनी व्यक्तीसाठी देवाच्या अपार दयेनुसार, व करुणेनुसार, देवाने एक योजना केली होती.


देवाने इस्राएल लोकांना सांगितले की, इस्राएलच्या कनान देशात सहा नगरांची उभारणी करा. त्यांची कुठे उभारणी करायची, कशी  उभारणी करायची ह्या संबंधी पवित्र शास्त्रात, जुन्या करारात अगदी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. त्यात असे सांगितले आहे, की, ज्याच्याकडून चुकून खून झालेला असेल, त्याने खून होताच त्वरेने धावायला सुरवात करायची होती. त्याने कुठे धावायचे, तर त्याच्या अगदी जवळ जे कोणते शरणपूर नगर बांधलेले आहे, त्याकडे त्या खुनी व्यक्तीने धावत जाऊन त्या नगरात आश्रय घ्यावयाचा होता. त्या नगरात पोहोचताच त्या खुनी व्यक्तीला अभय किंवा आश्रय मिळत होता. त्या नगरांना सिटीज ऑफ रेफ्युज किंवा आश्रयाची नगरे म्हणत असत.


आश्रयासाठी त्या मनुष्याने आपला जीव वाचवण्यासाठी तेथे धावणे आवश्यक होते. एकदा का तो मनुष्य त्या नगरात पोहोचला की मग त्या ठिकाणी तो पूर्ण सुरक्षेमध्ये सुरक्षित होत असे.


या नगरा बद्दल पवित्र शास्त्रात पाच गोष्टी सांगितल्या आहेत. इस्रायल लोकांनी ही नगरे कोठे व कशा प्रकारे उभारावी याचे देवाने काही नियम दिले होते.


१. आश्रय स्थानाची नेमणूक : आश्रयस्थान किंवा शरणपूर हे कुठल्या ठिकाणी असावे हे देव ठरवणार होता. म्हणजेच शरणपुराच्या स्थानाची नेमणूक देवाने केली. होती. मनुष्य ठरविणार नव्हता.ती मानवी इच्छा नव्हती. ते नगर शरणपूर असावे ही दैवी इच्छा होती आणि म्हणून पहिला मुद्दा हा आहे की, ह्या नगरांची नेमणूक करणारा देव होता.


२. आश्रयस्थान हे सुरक्षेचे ठिकाण :

ज्याच्या हातून चुकून खून झाला तो मनुष्य धावत, धावत जेव्हा त्या नगराच्या दराच्या आंत आला तेव्हा, पाठीमागून येणारा, त्याचा सूड घेणारा ,  तेथपर्यंतच म्हणजे आश्रय स्थानाच्या दारापर्यंतच येत असे. तो आत मध्ये प्रवेश करीत नसे. ही देवाची योजना होती. एकदा का हा मनुष्य म्हणजे ज्याच्या हातून चुकून चुकून झाला आहे तो मनुष्य त्या आश्रयस्थानी, त्या नगरामध्ये पोहंचला की तो सुरक्षा कवचाखाली येणार होता. देवाने आपल्या प्रीतीखातर या मनुष्याचा जीव वाचावा म्हणून ही शरणपुरे उभारायला लावली. सुरक्षा कवचामध्ये किंवाआश्रयस्थानामध्ये जो कोणी जाईल त्याला सुरक्षा प्राप्त होत असे. देवाने नेमलेले हे स्थान सुरक्षेचे स्थान होते.


३. आश्रय स्थानाची ठिकाणे :

हे स्थान कोठे असावे. याची योजना देवाने केली होती. असे स्थान असावे हे देवाने ठरविले होते व ते कोठे असावे हे देखील देवानेच ठरविले होते. देवाने इस्राएल लोकांना सहा जागा सांगितल्या होत्या. ह्या सहा जागा अशा स्थानात किंवा लोकेशनवर होत्या की, ती स्थाने भूभागाच्या दृष्टीने उंचावर होती. ही स्थाने उच्चस्थानावर का नेमली होती? कारण कोणालाही ते नगर सहजपणे व स्पष्टपणे दिसावे. असे म्हटलेले आहे की, “डोंगरावर वसलेले नगर लपत नाही”. तेंव्हा ही जी जागा आहे ती कोनाडयात, लपलेल्या ठिकाणी नव्हती. तर सर्वांना दिसून यावी अशी ती उच्चस्थानावर होती.


४. आश्रयस्थानाकडे जाणारी रस्ते :

ह्या स्थानाकडे जाणारे जे रस्ते होते, त्या रस्त्याबाबत विशेष देखभाल घेतली जात होती. या रस्त्यांची चांगल्या प्रकारे निगा राखली जात होती. म्हणजेच ते चांगल्या प्रकारे मेंटेन्ड केले जात होते. आश्रयासाठी धावणाऱ्या व्यक्तीला  लवकर, वेगाने त्या ठिकाणी जाता यावे म्हणून ते रस्ते मेंटेन केले जात होते. त्या रस्त्यामधील अडखळण काढून टाकले जात होते.  म्हणजेच त्यांची उत्तम प्रकारे देखभाल केली जात होती.


५. आश्रय स्थानाचे दरवाजे सदैव उघडे  ठेवले जात असत:

(द गेट्स वेअर ऑलवेज ओपन)

सर्वात महत्वाची गोष्ट ती ही की, ह्या नगरांची जी वेस आहे, किंवा जे दरवाजे आहेत ते रात्रंदिवस  उघडे ठेवायला सांगितले होते. “वेशी सतत उघड्या असत.” मध्यरात्री जरी त्या मनुष्याला पळून यायचे झाले तरी त्या आश्रयासाठी धावणाऱ्या व्यक्तीसाठी  त्या नगराच्या वेशी उघड्या असत.


ह्या पाच गोष्टी शरणपूराच्या संदर्भात सांगितल्या आहेत. ह्या अतिशय मौल्यवान आहेत. आपण पहातो की, देवाने इस्राएल लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.


पण आज आपल्याला ह्या गोष्टी माहिती करून घेण्याचे काय कारण आहे. ह्या गोष्टी कशाचे दर्शक आहेत? ही जी शरणपूरे आहेत. ते आपल्याला काय दर्शवितात? त्याच्यापासून आपल्याला काय बोध घ्यावयाचा  आहे?


आश्रयाच्या नगरांबद्दल  गणना ३५, यहोशवा २० मध्ये सविस्तर माहिती पवित्र शास्त्रात दिलेली आहे. नवीन करारामध्ये याचा संदर्भ इब्री ६:१८,१९ मध्ये आहे.


वचन १८  "ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धांवलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे  देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे;


वचन १९ "ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ “पडद्याच्या आंतल्या भागी पोहंचणारी आहे”.


आता ज्याप्रमाणे त्या मनुष्याच्या हातून हत्या झाली होती, त्या मनुष्याला धावत, धावत त्या नगराच्या आश्रयाला जावे लागत होते. तसे आपण देखील धावलेले आहोत आणि आपण त्या नगरात गेलेले आहोत. असे उपरोक्त शास्त्र वचनात का सांगितले आहे?


इब्री लोकास पत्रात संत पौल म्हणतो, आपण देखील धावलेले आहोत. म्हणजेच आपणदेखील अपराधी आहोत. आपण अपराध केलेला आहे. आपणाकडून देखील काहीतरी झालेले आहे. जसे त्या व्यक्तीकडून चुकून अपराध घडला त्यामुळे तो त्या पाठलाग करणाऱ्या व्यक्ती समोर, व देवासमोर अपराधी ठरला होता. अगदी तसेच आपण देखील आपल्या पापामुळे देवासमोर अपराधी ठरलो म्हणून आपणही आश्रयासाठी धावत, धावत त्या नगरात गेलेले आहोत, असे म्हटलेले आहे. मग तुम्ही आणि मी कोणता अपराध केलेला आहे? जसे त्या व्यक्तीचा, ज्याची हत्या झालेली आहे, त्याचा नातेवाईक ज्याला सूड घेणारा किंवा अवेंजर म्हटलेले आहे. तो खूनी व्यक्तीच्या पाठीमागे त्याचा सूड घेण्यासाठी धावत होता. तसा आपल्या पाठीमागे कोण येत होता  की आपल्याला पळावे लागले आहे? त्या आश्रयाच्या नगरामध्ये ! आणि ते आश्रयाचे नगर कोणते आहे, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.


देवाचे वचन सांगते, सर्वांनी पाप केले आहे. देवाच्या विरोधात तुम्ही आणि मी हा गुन्हा केलेला आहे. “पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली, तेंव्हा पासुनचाच मी पापी आहे.” जन्माने आपण पापी आहोत. आपण सर्व नैसर्गिक मनुष्य म्हणून जन्मतो. आदामा पासून जे काही पापाचे बीज आलेले आहेत ते पुढच्या, पुढच्या पिढी मध्ये आलेले आहेत. पापाचा हा रोग आहे. आणि आपण देखील पाप करतो. आपले पाप हा देवाच्या विरोधात केलेला गुन्हा आहे. तेंव्हा आता देवाच्या न्यायामुळे आलेला देवाचा क्रोध (रॅथ ऑफ गॉड) तो आपल्या मागे धावतो आणि मग आपल्याला पळावे लागले. मग आम्ही कुठे धावलो? तर आमच्या आश्रयाचे नगर म्हणजे प्रभू येशूकडे. देवाची स्तुती असो!!!  आमचे जे शरणपूर आहे ते प्रभू येशू आहे आणि आम्ही प्रभू येशूकडे केवळ देवाच्या कृपेमुळे आश्रयास धावलो कारण ही धावण्याची कृपा देखील देवच देतो.


इब्री. पत्रात ६:१८,१९

उपरोक्त वचनाप्रमाणे आता आपल्यापुढे आशा ठेवलेली आहे. नांगर म्हणजे जहाजाला स्थिर ठेवण्यासाठी असलेले एक साधन ती आमची आशा आहे. तसेच आमचा जो विश्वास आहे तो कोणावर तरी गुंतवून घट्ट केलेला आहे. कोणावर हा विश्वास घट्ट केलेला आहे? निश्चितच आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर. आम्ही आमचा विश्वास ख्रिस्तावर घट्ट ठेवल्यामुळे  आम्ही त्यालाधरूनन आहोत. आणि तो विश्वास आम्हाला, ख्रिस्तामुळे कोठे घेऊन जातो हे देखील शास्त्रात सांगितले आहे. थेट परमपवित्र स्थानात !!!


ही जुन्या करारात वर्णन केलेल्या निवास मंडपातील जागा आहे. त्या निवास मंडपाचे ३ भाग होते. बाहेरचे अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान ह्यांच्यामध्ये पडदा होता. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जेंव्हा प्राण सोडला. तेंव्हा परमपवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत दुभंगला. तेंव्हा आता इब्री लोकास पत्रात सांगितले आहे त्याप्रमाणे जी आमची आशा आहे, आणि जो विश्वास आहे तो प्रभू येशुमध्ये आम्ही नांगराप्रमाणे टाकलेली आशा व विश्वासाची मजबूत दोर असा आहे. तो आपल्याला कोठपर्यंत घेऊन जातो तर थेट परमपवित्र स्थानापर्यंत घेऊन जातो. परमपवित्र स्थानात प्रत्यक्ष देवाचे तेज उतरून आलेले होते. त्यास शेखायना ग्लोरी म्हणजे गौरवितेज  असे म्हटलेले आहे. शेखायना ग्लोरी म्हणजे देवाची जी पवित्र समक्षता आहे, तेज आहे त्या ठिकाणी उतरून येते. तेंव्हा डायरेक्ट आम्हाला प्रभू येशूमुळे परम पवित्र स्थानात देवाच्या अगदी सानिध्यात आत्मिकरित्या जाता येते. प्राचीन काळी त्या ठिकाणी सामान्य मनुष्याला जाता येत नव्हते. याजकालाही जाता येत नव्हते. फक्त प्रमुख याजकाला वर्षातून एकदाच त्या ठिकाणी प्रायश्चिताच्या दिवशी कोकऱ्याचे रक्त शिंपडण्यासाठी जाण्याची परवानगी होती.


आता आमचा प्रमूख याजक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो आता आंतमध्ये प्रवेश करून गेलेला आहे. परंतू बैलाचे, बकऱ्याचे रक्त घेऊन गेलेला नाही तर स्वतःचे रक्त घेऊन गेलेला आहे. तुमच्या आणि माझ्या पापांची खंडणी म्हणून स्वतःचे रक्त आतमध्ये म्हणजे परम पवित्र असताना घेऊन गेला. थेट परमपवित्र स्थानात ! म्हणजे देवाच्या अत्यंत निकट सानिध्यात. तेथे देवाने आमच्यासाठी प्रवेश खुला केला आहे. कारण प्रभू येशूने आमच्या सर्व पापांचा दंड भरलेला आहे. आम्हाला पापांपासून सुटका मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला देवाजवळ डायरेक्ट प्रवेश आहे. त्यामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत. आम्हाला देवाच्या क्रोधापासून कोणी सुरक्षा दिलेली  आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आज सुरक्षा दिलेली आहे. येशूच्या रक्ताच्या कव्हरिंग खाली तुम्ही आणि मी आहोत. म्हणजेच आम्ही कोठे धावलेले आहोत. त्या शरणपूरात, त्या आश्रयाच्या नगरात आम्ही धावलो. म्हणजेच येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला.


आता आम्हाला माहित आहे की, ह्या ज्या उपरोक्त पाच गोष्टी होत्या त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगत होत्या


१. आश्रयाच्या नगराचे नेमणूक :

जशी शरणपूराची नेमणूक देवाने केली. तसे प्रभू येशू तुमचा आणि माझा तारणारा असावा ही नेमणूक तुम्ही आणि मी केली का? नाही. प्रभू येशूची नेमणूक आमच्या तारणासाठी आणि मुक्तीसाठी देवाने युगाच्या स्थापनेपूर्वी केलेली होती. पृथ्वी निर्माण होण्या अगोदर देवाला माहीत होते की मनुष्य पाप करणार. ह्या पृथ्वीवर मनुष्याच्या हातून पाप होणार. पापावर इलाज म्हणून आधीच देवाने येशू ख्रिस्ताची नियुक्ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आश्रयस्थान म्हणून केलेली आहे.


२. आश्रयस्थानामधील सुरक्षा :

जो कोणी त्या नगरात धावत, धावत, वेळ न घालविता, त्वरित जात होता, तो सुरक्षित होता. पण जो थांबून आश्रयाच्या नगराच्या बाहेर रहात असे, बाहेर रेंगाळत असे तो धोक्याच्या ठिकाणी होता. सूड घेणाऱ्याने त्याचा सूड घेतला तर तो रेंगाळणारा व्यक्तीच स्वतःच्या मृत्यूस जबाबदार असणार होता. आज शुभ वर्तमान लोकांना समजून देखील पुष्कळ लोक आत्मिकरित्या जागच्या जागी बसून रहातात, प्रभू येशू जो आश्रयाचा नगर त्याकडे पळत नाहीत. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्याला स्वीकारत नाहीत, त्याच्यामुळे काय होते? ते अनंतकालिक  मृत्यूकडे वाटचाल करतात. कधी मृत्यू येईल ते सांगता येत नाही. आणि तो मनुष्य नाशाकडे कधी जाईल हे देखील सांगता येत नाही. श्रीमंत मनुष्याप्रमाणे असे लोक  अधोलोकाच्या यातनास्थानात जातात असे बायबल वरून आपल्याला कळते. कारण ते आत्मिकरित्या धावले नाहीत. कोणाकडे तर आश्रयस्थानाकडे, येशू ख्रिस्ताकडे. आपण सर्व विश्वासणारे आश्रयाच्या नगराकडे धावलेले आहोत. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. जेंव्हा केव्हाही, जो कोणी त्या नगरात जातो, तो सुरक्षाकवचात प्रवेश करतो. तसे येशू ख्रिस्ताकडे जो कोणी येईल तो अनंतकालिक सुरक्षेमध्ये प्रवेश करेल. त्यावर देवाचा क्रोध येणार  नाही.


ज्यावेळेला मिसर देशावर दहा पीडा देवाने पाठवल्या त्यातील एक पीडा अशी होती की, प्रत्येक घरातला पहिला (ज्येष्ठ) जो कोणी जन्मला असेल त्यावर देवाचा क्रोध येऊन तो मरण पावणार होता. फक्त यामध्ये एक अपवाद दिला होता .ज्या घराच्या दाराच्या कपाळपट्टीवर ते कोकऱ्याचे रक्त लावले होते तेथे मृत्यू प्रवेश करणार नव्हता. ते सुरक्षित स्थान होते. ते आश्रयस्थान झाले होते. ते शरणपूर झाले होते.


आता कोकरा जर आपला प्रभू येशू झालेला आहे आणि कपाळपट्टी म्हणजे आमचे हृदय म्हणजे, आमचे अंतःकरण आहे तर आमचे अंतःकरण येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली आल्यामुळे आमचे शरीर, जीव, प्राण हे सुरक्षित झालेले आहेत. दाराच्या कपाळपट्टीवरील रक्त पाहून दूत पुढे ओलांडून पुढे जातो, तसा देवाचा क्रोध आम्हाला स्पर्श करणार नव्हता. तसे येशुमध्ये जो कोणी आहे, तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. त्याच्यासाठी अनंतकालिक मृत्यू नाही. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.

प्रेज द लॉर्ड !!


योहान ५:२४ वाचा “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे”.


अनंतकालिक मरणातून आपण सार्वकालिक जीवनात पार गेलेले आहोत, त्यामुळे हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे कोणी ह्या सुरक्षा कवचाखाली येतात त्या सर्वांसाठी आहे.


आता आपण पाहतो हे जे आश्रयाचे स्थान होते, ते उच्च स्थानी होते. ते अशा ठिकाणी होते की ते सर्वांना दिसावे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर, त्याच्या शिष्यांनी ही सुवार्ता पूर्ण जगामध्ये अशा प्रकारे गाजविली की, जगाची उलथापालथ करणारे हेच का ते असे त्यांच्याबद्दल लोक म्हणू लागले. आपला प्रभू जगामध्ये अनेकांना माहित झाला. आजच्या काळात देखील  ज्या ठिकाणी देवाच्या वचनास बंदी होती अशा कम्युनिस्ट व इतर कट्टर राष्ट्रांत  देवाचे वचन टीव्ही व सॅटेलाईट, द्वारे जणू आकाशातून पोहोचवले गेले. ही देवाची महान योजना आहे. कोणीही देवाच्या वचनापासून म्हणजे शुभ वर्तमाना पासून वंचित होणार नाही याची देवाने दक्षता घेतली आहे आणि त्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचे तारण सर्वांना प्रकट केले आहे. ही जबाबदारी आता आपल्यावर म्हणजे मंडळी वर टाकलेली आहे. आपल्याला तारणाची घोषणा जितक्या लोकांपर्यंत पोचवता येईल तितक्यापर्यंत पोह्चवयाची आहे. प्रभूला आम्ही उंच करावे म्हणजे तो इतरांना दिसेल, प्रभूची ही इच्छा आहे की आम्ही प्रभू येशूला उंच करावे म्हणजे तो इतरांना दिसेल. आम्ही जर स्वतःलाच उंच केले तर इतरांना आपला प्रभू दिसणार नाही. आम्ही प्रभू येशूला जर उंच केले तर,तो अनेक जीवात्म्यांना दिसेल, त्याच्याकडे ते येतील.


प्रभू येशू ख्रिस्त असे म्हणतो की, "तुम्ही मला उंच केले तर", याचा अर्थ थोडा वेगळा आहे. प्रभू , वधस्तंभावर मला उंच केले तर असे म्हणतो. त्या वधस्तंभाद्वारे अनेकांना मी आकर्षून घेईन हे त्याला म्हणायचे आहे. मॅग्नेट जसे लोखंडाला आकर्षून घेते त्याप्रमाणे.


४. आश्रय स्थानांचे रस्ते व त्यांची देखभाल : शरणपुरांकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो कठीण नाही. प्रभू येशूचे शुभ वर्तमान ऐकून विश्वासाने स्वीकारणे हे कठीण नाही. यासाठी कोणतीही कर्मकांडे करावी लागत नाही. तारणात येण्यासाठी फार मोठी कर्मकांडांची किंवा शारीरिक कसरतीची अडखळणे ठेवलेली नाहीत.


पवित्र शास्त्रात एक उदाहरण आहे त्या उदाहरणात दोघे जण प्रार्थनेसाठी  मंदिरात आले होते. एक परुशी व एक जकातदार. जकातदाराने एवढीच प्रार्थना केली.... हे देवा मज पाप्यावर दया कर. ही एक वाक्याचीच प्रार्थना होती. यावर आपला प्रभू  म्हणाला हा (जकातदार) नीतिमान ठरून निघून गेला.


पहा आश्रयस्थानाकडे जाणारे रस्ते किती सोपे आहेत. हा जो रस्ता आहे, तो प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याचा रस्ता आहे, तो तारणात येण्याचा रस्ता आहे, प्रभू येशूवर ठाम विश्वास ठेवायचा आहे. किती सोपे आहे. आम्ही काय करावे? माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे? तर येशू ख्रिस्ताचा स्वीकार कर, त्याच्यावर विश्वास ठेव. पश्चाताप आणि विश्वास..... बस.... किती सोपे केले आहे. त्याच्या शिवाय इतर मार्ग नाही. तारणात जाण्यासाठी.  तारणाकडे जाताना अडखळण ठेवलेले नाही. जगातल्या कोणाला ही जो कोणी अगदी मरतानाही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. पण मरणाची वाट बघू नका, कारण ते मरण कधी येईल हे सांगता येत नाही. तारणात जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय सोपा आहे.


५. आश्रय स्थानाच्या नगराच्या वेशीचे दरवाजे सतत उघडे ठेवण्यास सांगितले आहे: याचा अर्थ प्रभू येशूकडे जाण्याचे आज हे कृपेचे दरवाजे सतत आणि सतत उघडे आहेत. कधी पर्यंत? लोकांतरण होई पर्यंत. एकदा का लोकांतरण झाले की महासंकट काळात फार कठीण परिस्थिती येणार आहे. आज त्याची कृपा आहे. आजच येशूच्या आश्रय स्थानात जा, वाट पाहू नका रेंगाळू नका. आपल्या जीवनात प्रभूला ताबडतोब स्वीकारा कारण पुढे जो न्यायाचा प्रसंग येणार आहे त्यातून विश्वासणाऱ्यांना जावे लागणार नाही. पुढे या पृथ्वीवर फार मोठे संकट येऊ घातले आहे. त्यात तुम्ही सापडले जावे ही देवाची इच्छा नाही. आणि म्हणून आज दरवाजे उघडे आहेत हे लक्षात घ्या.


दरवाजा म्हटल्यावर तुम्हाला नोहाच्या तारूच्या दरवाज्याचीआठवण येते का? त्या तारवाला एकच दरवाजा होता. एकच दरवाजा ठराविक काळापर्यंत उघडा होता. मग असे म्हटले आहे की, देवाने दरवाजा बंद केला. जर देवाने दरवाजा लावला तर कोणी मनुष्य तो दरवाजा उघडू शकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही महासंकट काळात स्वीकारू. ते शक्य नाही. कारण ज्यांना एकदा सत्य समजले आहे, त्याचा ज्यांनी धिक्कार केला त्यांना महा संकट काळात संधी मिळेल हे सांगता येत नाही. आजच कृपेचे दरवाजे उघडे आहेत. आत जा.. तारणात प्रवेश करा! ज्यांना आज शुभवर्तमान समजले आहे त्यांच्यासाठी पुन्हा संधी नाही. नाही... पुन्हा शक्यता नाही. उलट त्यावेळेला भुरळ पाडणारे आत्मे काम करताना दिसतील. महा संकट काळात अगाध कुपातून काही पतन पावलेले आत्मे बाहेर पडणार आहेत, हेच बायबल मध्ये सांगितले आहे. म्हणून फार कठीण समय पुढे येणार आहे. त्याच्या अगोदर प्रियांनो, प्रभू येशूचा स्वीकार करा. दरवाजा उघडा आहे. त्यातून आत मध्ये जा. येशूच्या आश्रय स्थानात सुरक्षित व्हा, त्या सुरक्षा कवचात जा. सुरक्षित रहा. अनंत कालिक सुरक्षेचा लाभ मिळवा.


शरणस्थानांच्या बाबतीत आणखीन एक नियम असा होता, की, ह्या पळालेल्या मनुष्याने आपल्या आई-वडिलांपासून, आपल्या घरदारा पासून, शेतीवाडी पासून किती दिवस ह्या आश्रयस्थानात रहावयाचे याबाबत हा नियम होता.


त्या आश्रय नगराचा प्रमुख याजक मरत नाही तोपर्यंत त्या पळून आलेल्या व्यक्तीने त्या नगरात राहणे आवश्यक होते. एकाप्रकारे तो बंदी आहे. प्रिझनमध्ये आहे. कारण ते आश्रयस्थान सोडले तर, सूड घेणारा आलाच! म्हणून त्या सूड घेणाऱ्यापासून वाचण्यासाठी त्या नगरातच आश्रयासाठी पळून आलेल्या व्यक्तीला रहावे लागत असे. सर्वापासून दूर, नातेवाईकांपासून दूर !


या नियमाचा अध्यात्मिक अर्थ काय आहे? आश्रयस्थानातून आपल्या लोकांकडे त्या व्यक्तीने कधी जायचे? त्या नगराचा प्रमुख याजक मरण पावल्यानंतर!!!


या मधले गहन सत्य हे आहे की प्रभू येशूच्या बाबतीत ही डबल टायपॉलॉजी म्हणजे प्रतिकात्मक गोष्ट आहे. कशी ते आपण पाहूया.


आम्ही पाप केले त्यामुळे आम्ही देवाचे गुन्हेगार ठरलो. मग आम्ही आश्रयाच्या नगरात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे, सुरक्षेसाठी म्हणजे देवाच्या क्रोधापासून सुटका मिळण्यासाठी धावलो. आता ते आश्रयाचे नगर हे प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शक आहे तसेच त्या नगराचा प्रमुख याजक हा देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे. हा याजक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोन हजार वर्षापूर्वीच मरण पावला आहे. त्यामुळे आता आमच्यावरचा देवाचा क्रोध काढला जातो आम्ही मुक्त होतो. जणू काही काहीच अपराध केला नाही या प्रकारे आमची गणना होते यालाच जस्टिफिकेशन असे म्हणतात. त्यामुळे आम्ही आता आमच्या आप्तामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, ख्रिस्तामध्ये, आत्मिक प्रजेमध्ये स्वतंत्रतेने राहू शकतो. आम्ही आता कोणत्याच प्रकारच्या बंदीवासात नाही. ही पहिली गोष्ट.


दुसरी गोष्ट आमच्या हातून पाप घडले, तर मानवी प्रमुख याजका प्रमाणे नव्हे, तर ज्याला कधीही मरण येत नाही असा सदैव जिवंत असणारा असा प्रमुख याजक आपल्यासाठी आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी सदैव जिवंत हा एक दुसरा पैलू आहे.


हे दोन टाईप्स किंवा प्रतीके आहेत.

प्रभूचे हे दोन प्रमुख प्रतिकात्मक अस्पेक्ट्स त्याच्या याजकीय सेवेचे आहेत.


एक तो आमच्यासाठी मरण पावला. त्यामुळे आमची सुटका झाली. आता आम्ही बंदिवान नाही तर येशू आमच्यासाठी मरण पावल्यामुळे आम्ही मुक्त झालेले आहोत. कशा पासून तर ह्या सर्व गुन्ह्यापासून (पापांसून).


दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जीवनात काही पाप घडले तर, मध्यस्थी करणारा प्रभू येशू आहे. आम्ही जेंव्हा पाप करतो, तेंव्हा आमच्या व देवाच्या नात्यामध्ये म्हणजे रिलेशनशिप मध्ये आडपडदा येतो. त्यामुळे, आमच्या हृदयातील शांती निघून गेल्याप्रमाणे आमची स्थिती होते. त्यामुळे आम्ही दुःखी, कष्टी होतो.


हे होऊ नये म्हणून तो म्हणतो, तुम्ही पापांची कबुली द्या, पश्चाताप करा आणि प्रभूचा जो अनिर्वाच्य आनंद आहे त्यात प्रवेश करा. त्यात पुन्हा प्रवेश करा, आजच आपण प्रभू येशूला आपले आश्रयस्थान करू. तो आम्हाला सर्व अरिष्ठापासून वाचवील. देवाच्या न्यायापासून, क्रोधापासून वाचवेल. सैताना पासून आपले संरक्षण करील. आम्हाला प्रभू येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली संपूर्ण सुरक्षा आहे. युगानुयुगाची शांती आम्हास प्राप्त होणार आहे.


माझ्यासाठी जर कोणती सुरक्षित जागा असेल, तर ती म्हणजे

दाविदाने स्तोत्र ९१:१ मध्ये म्हटल्याप्रमाणे, "जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. " सर्व समर्थांची सावली म्हणजेच येशू खिस्त. जो येशूच्या ठायी राहातो, तो परात्पराच्या गुप्त स्थळी, म्हणजे देवपित्याच्या हातात त्याच्या सुरक्षेत राहातो.


आश्रयाची जी सहा शरणपुरे होती त्या सहाही नगरांच्या नावामध्ये येशूची स्वभाव गुण वैशिष्टये दिसून येतात.


१.केदेश: हे पहिले नगर होते.

(यहोशवा २०:७-८). केदेशचा अर्थ

पवित्रता. प्रभू येशु म्हणतो, मी नितीमानास नव्हे तर पाप्यास तारावयास आलो.

'आमचा पवित्र प्रभू' हा केदेश म्हणून आमच्यासाठी आला

आहे. जे पापी आहेत त्यांनी धावत त्या आश्रयाच्या नगरात जावे, केदेशमध्ये जावे. येशुकडे जावे. कारण केदेश नगर म्हणजे आमचा प्रभू येशू आहे.


२) शखेम - शखेम याचा अर्थ आहे खांदा (शोल्डर). खांदा सामर्थ्य दर्शवितो. नितीमानाला सामर्थ्य किंवा बळ देणारा जर कोण असेल तर तो आमचा शखेम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हाच आमचे आश्रयाचे नगर आहे. आम्ही जेव्हा धावत असतो, पळत असतो,

अस्वस्थ असतो, तेव्हा प्रभू येशु ख़िस्त आाम्हास सामर्थ्य. पुरवीत असतो.


३) हेब्रोन - हेब्रोनचा अर्थ सहभागीता असा आहे. जेव्हा सर्व जगाने आपल्याला टाकलेले असते, या जगात आम्ही जेव्हा एकटे पडलेले असतो किंवा एकटेपणाने जगत असतो, तेव्हा प्रभू आम्हाला म्हणतो, 'मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. मी तुम्हास एकटे

असे सोडणार नाही. मी तुमच्या बरोबर सदोदित आहे. तुम्ही भिऊ नका. प्रभू आमचा मित्र होतो व गोड सहभागिता देतो.


४) गोलान - गोलान याचा अर्थ आनंद (जॉय) असा आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, असे म्हणून जे दुखी, भग्न अंतःकरणाचे आणि अनुतप्त लोक आहेत, त्यांना प्रभू गोलान म्हणजे आानंदाच्या ठिकाणी बोलावीत आहे. प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळणारा आनंद

चिरकाल टिकणारा आहे.

आमेन.


५) बेसेर- बेसेर म्हणजे किल्ला (फोर्टट्रेस) किंवा उंच गढी किंवा

गड. गड किंवा किल्ला हे सुरक्षेचे स्थान असते. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा गड आहे. त्याने शत्रूचा पराभव केला आहे. साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तींवरचा अधिकार प्रभुने त्याच्या विश्वासणाऱ्यांना दिला आहे.

तो आमचे सुरक्षित स्थान आहे.


६) रामोथ - रामोथ याचा अर्थ उंची किंवा हाईट असा आहे. आम्ही धुळीसारखे कंगाल झालेले असताना, देवाचे वचन सांगते,

"तो कंगालाला धुळीतून वर उचलतो, आणि राजेपदाला पोहोचवितो."

(स्तोत्र. ११३:७,८)

आज जर आमची अवस्था धुळीत पडल्यासारखी असेल, दैहिक, आत्मिक आणि वैचारिकदृष्ट्या आम्ही जर धुळीत मिळालेले असू , तर आज देवाचे वचन

सांगते की, 'तो कंगालास धुळीतून वर उठवितो आणि राजे पदाच्या पंक्तीस बसवितो, "कारण प्रभू आमचा रामोथ आहे, तो आमची उंची आहे. तो आमच्या देहातील देखील सर्व गरजा पुरवतो.


केदेश, शखेम, हेब्रोन, बेसेर, रामोथ आणि गोलान ही सहा आश्रयाची नगरे जुन्या करारात दिली आहेत. सातवे विशेष ठिकाण प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे स्वर्गाचे राज्य आहे.


प्रभू येशू ख्रिस्त खरोखर आपले आश्रयाचे नगर आहे. या ठिकाणी आम्हाला पूर्ण विसावा मिळतो. आणि त्याच्या म्हणजेच स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक शांती व सुराक्षितता मिळते. अशाप्रकारे आश्रयाच्या नगराचे किंवा शरणपुरांचे मर्म प्रभुने आपल्याला प्रगट केलेले आहे.


त्याच्याच नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि युगानुयुग असो.


God bless you.


रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे

मोबा.9764158800


टीप : (उपरोक्त लेख हा रेव्ह.डॉ. राजकुमार कोरे यांनी सेंट जॉन्स स्कूल हॉल, पुणे, मध्ये दिलेला संदेश आहे. तो ब्र.अमित थोरात आणि ब्रदर अरविंद थोरात यांनी ट्रान्सस्क्रिप्ट केला आहे. त्यांच्या सौजन्या बद्दल मी आभारी आहे. पास्टर राजकुमार कोरे यांनी त्यात महत्त्वाचे एडिटिंग केले आहे.)


 
 
 

Recent Posts

See All
नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का?

नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का? लेखक : रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे...

 
 
 

Comments


bottom of page