
नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का?
- Rajkumar Kore
- Aug 10
- 7 min read
नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का?
लेखक : रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
मोबा.9764158800
प्रश्न : ज्याप्रमाणे निवास मंडप हा पवित्र होता. ते पवित्र स्थान असावे ह्या उद्देशाने त्याची स्थापना देवाने केली होती त्याचप्रमाणे मानवाने पवित्र रहावे या उद्देशाने देवाने मानव जातीची स्थापना केली. निवास मंडपात सेवा करणाऱ्या याजकांनी निवास मंडपात पवित्र रहावे ही तर देवाची इच्छा होतीच होती परंतु निवास मंडपाच्या बाहेर देखील त्यांच्या सामाजिक जीवनात याजकांनी पवित्रच रहावे हीच देवाची इच्छा होती. अगदी तसेच विवाह संस्था देखील देवानेच निर्माण केली होती व ती पवित्र असावी हीच देवाची इच्छा होती. विवाह व्यवस्थेतील पती-पत्नीपैकी कोणा एकाच्या अविश्वासूपणामुळे मानवी कुटुंब संरचनेवर व सामाजिक व्यवस्थेवर घातक आणि नाशकारक परिणाम होत असतील तर अहरोनाच्या पुत्रांसाठी त्यांनी केलेल्या पावित्र्यभंगासाठी शिक्षेचा जो निकष वापरला गेला व जी शिक्षा अहरोनाच्या पुत्रांना दिली गेली तोच निकष विवाह व्यवस्थेतील अविश्वासू जोडीदाराने केलेल्या विवाह संस्थेतील पावित्र्यभंगाच्या पापासाठी का वापरला जाऊ नये व तीच शिक्षा अनुवाद २४:१ मध्ये देवाने अविश्वासू जोडीदाराला का दिली नाही ?
उत्तर : बायबल मधील काही मूलभूत शाश्वत सत्य यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल:
१.पावित्र्य भंग हे पाप आहे. कोणतेही पाप हे पाप आहे ते निवास मंडपातील असो किंवा विवाह संस्थेतील असो आणि देवाला पापाचा वीट आहे.
१ योहान ५:१७
"सर्व प्रकारची अनीती पापच आहे;"
स्तोत्रसंहिता ५:५
"सर्व कुकर्म करणार्यांचा तुला तिटकारा आहे."
२.पापाचा परिणाम दैवी न्याय आणि शिक्षा ही निश्चित आहे.
रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहे,"
३.देव नीतिमान न्यायाधीश आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. तो कधीही विपरीत न्याय करीत नाही.
स्तोत्रसंहिता ७:११
"देव न्यायी न्यायाधीश आहे;"
ईयोब ३४:१२
"देव नि:संशय काही वाईट करीत नाही, सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही."
४.देव सार्वभौम आहे. कोणाचा कसा आणि कधी न्याय करायचा याचा अंतिम अधिकार त्याच्या हाती आहे. त्याच्या न्यायत्वानुसार तो योग्य निर्णय योग्य वेळी घेत असतो.
दानीएल ४:३५
"पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही."
यिर्मया ३२:१९
"तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत."
देव अहरोनाच्या पुत्रांवर आणलेल्या न्यायाप्रमाणे अविश्वासू जोडीदाराचा कठोर व तात्काळ न्याय का करत नाही?
ज्याप्रमाणे देवाने अहरोनाच्या पुत्रांवर कठोर व तात्काळ न्याय आणला तसाच न्याय आजच्या काळात किंवा जुन्या कराराच्या काळात देखील देवाने अविश्वासू जोडीदारावर आणलेला दिसत नाही. यावरून असे लक्षात येते की काही पापांचे परिणाम आणि तीव्रता ही देवाच्या तात्काळ आणि कठोर शिक्षेस पात्र असते. तर मनुष्याच्या काही पापांच्या बाबतीत देव सहनशीलता बाळगतो. व मानवावर कृपेवर कृपा करतो.
५.देव न्यायाची भूमिका बजावत असताना देखील त्याचे चांगुलपण व त्याची दया ही कार्यरत असते.
स्तोत्रसंहिता १०३:८-११
"परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे."
१.लुसिफर हा पाखर घालणारा करूब होता. त्याच्या बंडखोरीची दखल देवाने तात्काळ आणि कठोर रीतीने घेतली. त्याला स्वर्गातून हाकलून देण्यात आले. आणि त्याच वेळेला अनंत कालच्या अग्नी सरोवरातील शिक्षेसाठी त्याच्यावर शिक्कामोर्तब निश्चित करण्यात आले. कालांतराने त्याला तेथे पाठवण्यात येणार आहे.
मत्तय २५:४१
"मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा."
उपरोक्त वचनातून हे दिसून येते की सार्वकालिक अग्नि हा मूळतः सैतान व त्याच्या दुतांसाठी तयार केला गेला होता.
२.उत्पत्ती सहा मधील घटनेत असे लक्षात येते की काही दूतांनी असे पाप केले की देवाने त्याची दखल तात्काळ घेऊन त्यांना अंधकारमय खाड्यात किंवा तार्तारोसात अंतिम न्यायासाठी बंदीवान करून ठेवले आहे.
यहूदा १:६
"आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले."
२ पेत्र २:४
"कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात राखून ठेवले;"
३.प्रेषितांच्या काळात हनन्या आणि सप्पीरा यांच्यावर तात्काळ मृत्यू आला. कृपेचा काळ चालू असताना देखील ! या उदाहरणात तात्काळ शिक्षा झाल्याचे दिसून येते.
प्रेषितांची कृत्ये ५:५
"हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले."
४.जुन्या कराराच्या काळात कोरह, दाथान व अबिराम यांनी मोशे विरुद्ध बंड केले त्यावेळेस परमेश्वर देवाने त्यांच्याविरुद्ध तात्काळ शिक्षा सुनावली.
गणना १६:१, २४, ३१-३२
"कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ
“मंडळीला सांग की, तुम्ही कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा.”
"हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली. आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली."
उपरोक्त सर्व घटनांमधून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की,
लूक १२:४८
"ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील."
जे आत्मिकरित्या विशेषअधिकार (प्रिव्हिलेजेस) पावलेले असतात, देव त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करतो. त्यांचे उत्तरदायित्व किंवा अकाउंटटॅबिलिटी इतरांच्या पेक्षा अधिक असते.
उदाहरणार्थ एखाद्या शाळेत एखादी गंभीर, अप्रिय, घातक व विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी घटना घडली तर त्या शाळेच्या शिपायापेक्षा त्या शाळेचा मुख्याध्यापक त्या घटनेला अधिक जबाबदार धरला जातो.
त्याचप्रमाणे मंडळींमध्ये मंडळीच्या सामान्य सभासदांपेक्षा मंडळीचे पास्टर व लीडर्स यांचे देवा समोर उत्तरदायित्व म्हणजेच अकाउंटटॅबिलिटी अधिक गणली जाते. मंडळीला देवाच्या योग्य शिक्षणात चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मंडळी जर चुकीच्या मार्गाला गेली तर मंडळीचे पाळक व लीडर्स यांची भूमिका महत्त्वाची गणली जाते. पाळक व लीडर्स ज्याप्रमाणे चालतील त्याप्रमाणे मंडळी त्यांचे अनुकरण करणार हे निश्चित म्हणून पाळक व लीडर्स हे त्या गोष्टीला जबाबदार धरले जातात.
यासंदर्भात जुन्या करारात अतिशय सुंदर प्रतीकात्मक सत्य वर्णन केले आहे.
पापार्पणाच्या बाबतीत लेवीय पुस्तकात एक अतिशय महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे.
लेवीय ४:२-३
“इस्राएल लोकांना असे सांग : परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले, म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोर्हा परमेश्वराला अर्पावा. "
लेवीय ४:१३-१४
" इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले, आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोर्ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शनमंडपासमोर आणावा."
उपरोक्त शास्त्र पाठावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की *एका अभिषिक्त याजकाने केलेले पाप संपूर्ण मंडळीच्या पापाशी समतुल्य गणन्यात आलेले आहे. एका अभिषिक्त याजकाने केलेल्या पापा बद्दल एक गोऱ्हा अर्पण करण्यास सांगितला आहे व संपूर्ण मंडळीने केलेल्या पापाबद्दल देखील एकच गोऱ्हा अर्पण करण्यास सांगितले आहे.
*याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की, मंडळीतील पाळकांना व मंडळीच्या पुढार्यांना जसा अधिकार जास्त तशी जबाबदारी व उत्तरदायित्व (अकाउंटटॅबिलिटी) देखील जास्त असते* म्हणून याकोबाच्या पत्रात म्हटले आहे की,
याकोब ३:१
"माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे."
आता आपण मूळ मुद्द्याकडे पाहिल्यास असे लक्षात येते की, अहरोनाच्या मुलांना याजक म्हणून सर्वसामान्य मंडळी पेक्षा विशेष अधिकार प्राप्त झाला होता. देवाची संपूर्ण इच्छा त्यांना माहीत होती. तरीदेखील त्यांनी जाणून बुजून देवाविरुद्ध बंडाळी केली.
लुसिफाराने देखील विशेष अधिकाराच्या ठिकाणी असताना उघड उघड देवा विरुद्ध बंडाळी केली होती.
कोरह, दाथान, व अबिराम हे देखील सरदार व मंडळीचे प्रतिनिधी होते. म्हणजेच त्यांना प्रिव्हिलेज प्राप्त झाले होते. मोशेची व अहरोनाची निवड परमेश्वरापासून आहे हे माहीत असूनही असून देखील त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंडाळी केली.
गणना १६:२
"हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते."
हनन्या व सपिरा यांच्या बाबतीत देखील तशीच गोष्ट होती. हे प्रेषितांच्या जवळचे लोक होते. तरीदेखील त्यांनी लबाडी केली.
बायबल नुसार याबाबत खालील प्रकारे न्याय केला जातो हे शास्त्र सांगते,
लूक १२:४७-४८
" आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता* ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला *पुष्कळ फटके* मिळतील, परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली *त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील."
उपरोक्त निकषानुसार अहरोनाच्या दोन पुत्रांचा न्याय अशास्त्रोक्त अग्नीचा वापर केल्यामुळे देवाने कठोर रीतीने तात्काळ केला.
मात्र विवाह संस्थेच्या बाबतीत जे जोडीदार जारकर्म किंवा व्यभिचार करतील त्यांचा न्याय देव करत नाही असे नाही.
इब्री १३:४
"लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. "
मत्तय ५:३१-३२
‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते. मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो."
मलाखी २:१४-१६
"तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”
उपरोक्त नवीन आणि जुन्या करारातील शास्त्रलेखाप्रमाणे देवाचे नियम दोन्ही करारात एकच होते ते बदलत जाणारे नव्हते हेच स्पष्ट होते. कारण देव हा न बदलणारा देव आहे.
देव हा सार्वभौम आहे आणि कोणाचा कसा आणि कधी न्याय करायचा याचा एकमेव *विशेष अधिकार* ( *सोल प्रेरॉगेटिव्ह* ) त्यालाच आहे. मानव ही निर्मिती आहे आणि त्याच्या सार्वभौम अधिकाराला आव्हान देऊ शकत नाही. परंतु सर्व समर्थ कधीही विपरीत न्याय करत नाही. त्याच्या बुद्धीच्याचातुर्यानुसार, अगाध ज्ञानानुसार व दयेनुसार त्याचे सर्व निर्णय असतात. व ते सर्वधैव योग्य व परिपूर्ण असतात.
शेवटी, इयोबाप्रमाणे देवाच्या स्वाधीन होणे यातच आपले हित आहे.
ईयोब ४०:१-१०
"परमेश्वराने ईयोबाला आणखी म्हटले, “हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्याने आता उत्तर द्यावे.” मग ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले. “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही; मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही.” देवाच्या सामर्थ्याचे मूर्त स्वरूप मग परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला : “आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला विचारतो, मला सांग. तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय? देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय? तू आपणास महिमा व प्रताप ह्यांनी भूषित कर; तेज व ऐश्वर्य धारण कर."
God bless you.
रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
मोबा.9764158800



Comments