top of page
Search

बायबल मधील संयोजन चित्रांचा अभ्यास

बायबल मधील गहन रहस्य


लेखक: रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे

मोबा.9764158800


संयोजन चित्रांचा अभ्यास

बायबल मधील त्याच व्यक्ती पण वेगळ्या संदर्भामध्ये व वेगळ्या संयोजनामध्ये म्हणजेच वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये पाहिल्यास त्यातून पवित्र शास्त्रातील एकवाक्यता भंग न पावता अतिरिक्त चित्तवेधक व अधिक खोलवर अर्थ निघतो हे खालील अभ्यासावरून दिसून येईल.

संयोजन चित्र १ :

(कॉम्बिनेशन पिक्चर - १ )

प्रतीकात्मक अर्थ

१. अब्राहाम : देवपित्याचा दर्शक आहे. कारण तो इसहाकाचा पिता होता व इसहाक ख्रिस्ताचा दर्शक आहे. इसहाकाने मोरया डोंगरावर होमार्पणाची लाकडे वाहून नेली. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने गुलगुथा म्हटलेल्या टेकडीवर वधस्तंभ वाहून नेला.

२. सारा : इस्राएलाची दर्शक आहे. कारण मुळात ती देहदृष्ट्या इस्राएल राष्ट्राची जननी सारा आहे. तिच्यापासून इसहाक, व इसहाका पासून याकोब, याकोबापासून बारा वंश झाले तेच इस्राईल राष्ट्र होय. देहदृष्ट्या ख्रिस्तही इस्राएलापासून म्हणजे यहुदातून जन्मला.


३. इसहाक: येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे. इसहाकाला वेदीवर फक्त ठेवण्यात आले परंतु वेदी वरून जिवंतच असे बाहेर काढण्यात आले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्यक्ष वेदीवर म्हणजे वधस्तंभावर आपला प्राण दिला.

हा प्रतीक (इसहाक) आणि वास्तवता (प्रभू येशू ख्रिस्त) या मधील फरक किंवा वैधर्म्य म्हणजे *कॉन्ट्रास्ट* आहे.

४. इश्माएल : जुन्या मनुष्याचा दर्शक. इसहाकाच्या आधी तो प्रथम जन्मला. तो आत्मिक नाही.

“तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.”

(१ करिंथ १५:४६ )

५. अब्राहामाचा सेवक: पवित्र आत्म्याचा दर्शक. अब्राहामाची आज्ञा मानून त्याने अब्राहामाचा पुत्र इसहाक याला वधू शोधण्यासाठी तो गेला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानानंतर व स्वर्गरोहणानंतर मंडळीला प्रभू येशूकडे आणण्यासाठी देवाने पवित्र आत्मा पाठवला. व तो आज येशु ख्रिस्ताच्या दुसर्‍या येण्याच्या भेटी साठी मंडळीला तयार करत आहे.

६. रिबेका : मंडळीची दर्शक कारण तिचा पती इसहाक ख्रिस्ताचा दर्शक आहे.

संयोजन चित्र -2 कॉम्बिनेशन - 2

१. सारा : स्वतंत्र स्त्री जी नव्या कराराची दर्शक आहे. जिला वरील यरुशलेम म्हटले आहे. म्हणजे या ठिकाणी सारा ही देहदृष्ट्या जी इस्राएल नाही म्हणजे सध्याच्या विश्वासणार्‍या विदेशी ख्रिस्ती मंडळीची या ठिकाणी या संदर्भामध्ये जननीरूप प्रतीक आहे. सारेला स्वतंत्र स्त्री म्हटले आहे. अगदी तसेच ख्रिस्तीमंडळी नियमशास्त्राच्या दास्यत्वाखाली नाही तर प्रभू येशूच्या कृपेमुळे नियमशास्त्रापासून स्वतंत्र आहे.

२. हागार : सीनाय पर्वतावरून देण्यात आलेल्या जुन्या कराराची दर्शक. सध्याच्या पृथ्वीवरील यरुशलेमेची ती प्रतीक आहे. म्हणजेच सध्याचे अब्राहामापासून झालेले व याकोबाच्या बारा पुत्रापासून झालेल्या इस्राएल राष्ट्राचे म्हणजेच देहदृष्ट्या यहुदी लोकांची ती प्रतीक आहे. कारण सध्याचे इस्राएल लोक यांनी अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळालेल्या कृपेचा स्वीकार केलेला नाही व नियमशास्त्राला ते धरून आहेत. नियमशास्त्राद्वारे तारण मिळेल असे त्यांना वाटते पण नियमशास्त्रापासून तारण नाही तर ख्रिस्तापासून तारण आहे ही वस्तुस्थिती आहे. ते नियमशास्त्राच्या दास्यत्वात असल्यामुळे ते दासीपुत्र म्हणजे हागाराच्या पुत्राप्रमाणे प्रतीकात्मकरित्या प्रस्तुत संदर्भात इश्माएल प्रमाणे आहेत.

३. इश्माएल : दासीपुत्र. हागारेचे संतान म्हणजे नियमशास्त्राच्या दास्यत्वाखाली असलेले सध्याचे देहदृष्ट्या यहुदी लोक.

४. इसहाक : स्वतंत्र स्त्रीचे म्हणजेच सारेचे संतान म्हणजेच नवीन कराराच्या विदेशी मंडळीचे दर्शक.

“ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत; एक तर सीनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.”

(गलतीकरांस पत्र ४:२४-२६,२८,३१)

उपरोक्त उलगड्यावरून एक गोष्ट लक्षात येते की व्यक्तींचे कॉम्बिनेशन म्हणजेच संयोजन व संदर्भ बदलल्यानंतर त्या प्रतीकातून वेगळा अर्थ सूचित होतो. संयोजन चित्र - 1 याच्याशी संयोजन चित्र - २ ची तुलना केल्यास या निष्कर्षांची प्रचिती येईल.

संयोजन चित्र - ३

१. पहिला आदम: ज्याची सुरुवात चांगली झाली परंतु नंतर तो पापात घसरला अशा ख्रिस्ती मनुष्याचा दर्शक. नंतर ज्याची प्रीती कोमट होऊन जो मागे घसरला आहे म्हणजे (बॅक स्लीडन) झालेला ख्रिस्ती मनुष्य.

२. हवा : ख्रिस्ताच्या मंडळीचे दर्शक ज्या ख्रिस्ती मंडळीची सुरुवात चांगली झाली परंतु नंतर जी मागे घसरली किंवा बॅक स्लाईड झाली त्या मंडळीचे दर्शक. उदाहरणार्थ इफिस येथील मंडळी.

३. काईन : नामधारी ख्रिस्ती जे अनिती मध्ये जगतात अशांचे अर्पण देव नाकारत असतो. कारण ते विश्वासाविरहित अर्पण असते.

“काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.”

(१ योहान ३:१२)

४. हाबेल : विश्वासणार्‍या ख्रिस्ती मनुष्याचा प्रतीक. हाबेलाने विश्वासाने देवाला अर्पण केले व ते अर्पण स्वीकारले गेले.

“विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.”

(इब्री ११:४)

५. हनोख : देवाबरोबर सातत्याने चालणार्‍या ख्रिस्ती विश्वासणार्‍याचा प्रतीक. जे देवाला संतोषवितात असे ख्रिस्ती.

हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे; ”’

(इब्री ११:५)

७. नोहा : त्याच्या पिढीतील नीतिमान विश्वासणारा. जगापासून स्वतःला वेगळे ठेवणार्‍या व पवित्र जीवन जगणार्‍या ख्रिस्ती मनुष्याचा प्रतीक.

“तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.”

(इब्री ११:७)

संयोजन चित्र - ४

१. आदाम : ख्रिस्ताचा दर्शक. पहिला आदाम सर्व मानव जातीचा देहदृष्ट्या सांघिक प्रमुख (फेडरल हेड) होता. तो गाढ निद्रेत असता त्याच्या फासळीपासून त्याची पत्नी बनवण्यात आली. व त्यानंतर तो जागा झाला. जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानातून मंडळीची निर्मिती झाली. व त्याच्या कुशीत भाला भोसकला गेला.

आपला प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणार्‍याचा आत्मिकदृष्ट्या संघीय प्रमुख आहे.

(रोमकरांस पत्र ५:१४)

आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे."

विभेद ( फरक) किंवा वैधर्म्य

( कॉन्ट्रास्ट ) : आदामात सर्व मरतात. पण ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातात.

“कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील;”

(१ करिंथ १५:२२)

२. हवा : आदामाची पत्नी ख्रिस्ताच्या मंडळीची दर्शक. “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.

(इफिसकरांस पत्र ५:३१-३२)

३. काईन : इस्राएल राष्ट्राचा दर्शक. हाबेल काईनाचा भाऊ असातानाही काईनाने हाबेलाचा खून केला. देहदृष्ट्या आपला प्रभू येशू ख्रिस्त यहुदी वंशात जन्मला असतानाही यहुद्यानीच म्हणजे त्याच्या बंधूंनीच ऐतिहासिकदृष्ट्या निरपराध ख्रिस्ताला वधस्तंभावर देऊन त्याचा खून केला. काईन ख्रिस्ताला वधस्तंभी देणाऱ्या यहुदी लोकांचा दर्शक आहे.

(खरे पाहता आत्मिकदृष्ट्या प्रभू येशू आपल्या सर्वांच्या पापांमुळे वधस्तंभावर गेला हे सत्य आहे. त्याच्या मृत्यूमध्ये आमचा देखील वाटा होता.)

४. हनोख : प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसर्‍या येण्याच्या वेळेस लोकांतरण म्हणजे रॅप्चर होणार्‍या मंडळीचा दर्शक.

“क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.”

(१ करिंथ १५:५२)


“कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.”

(१ थेस्सल ४:१६-१७)

५. नोहा : मंडळीच्या लोकांतरणानंतर महासंकट काळात प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणारे यहुदी लोक यांचा दर्शक आहे. जे ख्रिस्त विरोध्याचा शिक्का स्वतःवर मारून घेणार नाहीत ते लोक. ज्यांना देव महासंकट काळात येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे सुरक्षितरित्या विश्वासात राखणार आहे व संभाळणार आहे ते लोक.

“ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.” या ठिकाणी ती स्त्री म्हणजे ज्यांनी ख्रिस्त विरोध याचा शिक्का स्वतःवर मारून घेतलेला नाही असे इस्रायल लोक आहेत. नोहा या लोकांचा प्रतीक आहे.

(प्रकटी १२:६)

६. मोशे : प्रस्तुत संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसर्‍या येण्याच्या वेळेस जे प्रभू मध्ये निजलेले जिवंत होणार आहेत त्यांचा दर्शक मोशे आहे. कारण रूपांतराच्या डोंगरावर त्या ठिकाणी मोशे आणि एलिया हे दृष्टीस पडले. रूपांतराच्या डोंगरावरील घटना ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसर्‍या येण्याची पूर्व छाया होती. त्याप्रसंगी एलीया देखील दिसला होता. प्रभूच्या दुसर्‍या येण्याच्या वेळेस जे लोक जिवंत असणार आहेत व एलिया प्रमाणे सदेह उचलले जाणार आहेत एलिया हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून दर्शक आहे.

“तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.”

(मत्तय १७:२-३)


अन्य संदर्भात मोशे हा नियमशास्त्राचा दर्शक आहे.

“कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.”

(योहान १:१७)


कनान देशामध्ये मोशेला जाता आले नाही कारण मोशेने आज्ञा भंग केला होता. ही वास्तवता आहे.

पण याबाबत आत्मिक दृष्टीने गहन शोध घेतल्यास असे लक्षात येते की, मोशे हा नियमशास्त्राचा दर्शक आहे. नियमशास्त्राद्वारे स्वर्गीय कनानात प्रवेश करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मोशे नंतर दुसरा नेता निवडला गेला त्याचे नाव यहोशवा होते. अगदी त्याप्रमाणेच नियमशास्त्रानंतर म्हणजे जसे मोशे नंतर यहोशवाद्वारे इस्राएल लोकांना कनानात नेण्यात आले, तसेच नियमशास्त्र दानानंतर आपल्या प्रभु येशुचे पहिले येणे झाले व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो हेच सत्य देवाच्या वचना मधून प्रतीकात्मकरित्या स्पष्ट होते.

“माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.”

( यहोशवा १:२)


एकच व्यक्ती मोशे, पण दोन वेगवेगळ्या संदर्भांमध्ये ही एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या प्रकाराचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करते. हेच पवित्र शास्त्राचे सौंदर्य आहे.

प्रभू येशूची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.


God bless you.


रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे

मोबा.9764158800

 
 
 

Recent Posts

See All
नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का?

नादाब आणि अबीहू यांचा न्याय आणि अनुवाद २४:१ यामधील अविश्वासू जोडीदारांमधील न्यायात फरक का? लेखक : रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे...

 
 
 
जुन्या करारातील शरणपूरांचे मर्म

लेखक: रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे (डायरेक्टर फायर मिनिस्ट्री) जुन्या करारातील शरणपूरे किंवा आश्रयांची नगरे – द सिटीज ऑफ रेफ्युज यांचे गूढ...

 
 
 

Comments


bottom of page