बायबलच्या हिब्रू भाषेतील अद्भुत रहस्य
- Rajkumar Kore
- Aug 5
- 6 min read
लेखक: रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
प्राचीन काळी हिब्रू वर्णमाला मूळतः चित्रलेखन लिपी वापरून लिहिली जात होती. प्रत्येक अक्षर मूळतः एक चित्र होते. जे शब्द किंवा संकल्पना दर्शवत होते. ख्रिस्त पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी शिलालेखांवर आढळणारे हिब्रू लेखनाचे सर्वात जुने स्वरूप चित्रलेखन होते. नंतर, हिब्रू चित्रलेख (जे कधीकधी पॅलेओ-हिब्रू म्हणून ओळखले जाते) ते आजच्या हिब्रू रेषीय लिपीमध्ये विकसित झाले जे प्राचीन फोनिशियन वर्णमालासारखे होते. याची उदाहरणे नाणी आणि मातीच्या तुकड्यांवर (ज्याला ऑस्ट्राका म्हणतात) यावर आढळून येतात.
आज मात्र तोराह आणि वर्तमान पत्रे अरेमाइक शैलीतील लिपीचा वापर करतात.
बाबेलच्या बंदीवासात असताना इस्रायल लोकांनी ही अरेमाईक लिपी अंगीकारली. आधुनिक लिपी आता चित्रलेखनात्मक नसली तरी बायबल मधील हिब्रू अक्षरांचे मूळ चित्रलेखनात्मक अर्थ समजून घेतल्याने शब्दांची व्युत्पत्ती आणि सखोल अर्थ मिळू शकतो. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी साठी ही अर्थ लावण्याची पद्धत प्राथमिक किंवा मुख्य पद्धत म्हणून नव्हे तर दुय्यम पद्धत म्हणून सावधगिरीने व योग्य रीतीने वापरल्यास शब्दांच्या व्युत्पत्तीची आणि सखोल अर्थाची जोड मिळू शकते. मात्र हे करत असताना बायबलच्या शब्दशः व्याकरणात्मक- ऐतिहासिक अर्थ विवरण पद्धतीनुसारच (लिटरल, हिस्टॉरिकल - ग्रॅमॅटिकल एक्सीजेटीकल मेथड ऑर इंटरप्रिटेशन) अर्थ विवरण करणे हे आवश्यक व अनिवार्य आहे. हे विसरता कामा नये. बायबल मध्ये शब्दशः असलेली विधाने (एक्सप्लीसीट स्टेटमेंटस) हीच अंतिम व अधिकारयुक्त अर्थ विवरण पद्धतीचा पाया आहे हे सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना पवित्र शास्त्र हे बहुआयामी म्हणजेच हिऱ्याप्रमाणे अनेक पैलू असलेले अतिशय सखोल दैवी लिखाण आहे हे लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक स्तरावर त्यातून सुसंगत व एक वाक्यता असलेलाअर्थ प्रतिपादन केलेला आढळतो.
याचे उत्तम उदाहरण खालील शास्त्र पाठात आढळून येते.
(गलतीकरांस पत्र ४:२२-२६, २८, ३१)
"कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत; एक तर सीनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत."
सारा, हागार, इसहाक इश्माएल यांचा वृत्तांत जुन्या करारातील उत्पत्तीच्या पुस्तकात आढळून येतो. *उत्पत्ती मध्ये ही एक ऐतिहासिक घटना म्हणून नमूद केलेली आहे. या घटनेकडे पाहत असताना ही एक ऐतिहासिक, सत्य घटना आहे *हा अर्थ प्रथम घेणे आवश्यक आहे. यानंतर त्यातून काय नैतिक किंवा आध्यात्मिक अर्थ निघतो ते पाहणे महत्त्वाचे ठरते. *यामध्ये लाक्षणिक प्रतिकात्मक किंवा भविष्यात्मक असा खोल अर्थ देखील दडलेला आहे हे उपरोक्त गलतीकरास पत्रातील पौलाने केलेल्या उपरोक्त घटनेच्या अर्थ विवरणातून स्पष्ट होते.
या दोन स्त्रिया म्हणजे लाक्षणिक अर्थाने दोन करार आहेत असे पौल या ठिकाणी सांगत आहे . हागार ही सीनाय पर्वत म्हणजे जुन्या कराराची दर्शक आहे. आणि ती नियमशास्त्राप्रमाणे दास्यत्वासाठी मुलाला जन्म देते. थोडक्यात जे कृपेला सोडून नियमशास्त्रावर तारणासाठी भिस्त ठेवतात ते इश्माएला प्रमाणे दास्यत्वात आहेत. येशू ख्रिस्तापासून आज पर्यंतच्या काळातील यहुदी हे इश्माएलाप्रमाणे नियमशास्त्राच्या दास्यत्वामध्ये आहेत, असे पौल या ठिकाणी सांगत आहे. *आणि प्रभू येशू ख्रिस्ताची, म्हणजे विश्वासणाऱ्यांची मंडळी ही, सारा जी नवीन कराराची दर्शक आहे तिची व तिचा पुत्र इसहाक याची प्रतीक आहे. व पौल पुढे सांगत आहे की, प्रभू येशूची मंडळी ही स्वतंत्र *म्हणजेच नियमशास्त्राच्या दास्यत्वाखाली नसलेली ,पण कृपेखाली असलेली स्वतंत्र स्त्रीची म्हणजेच सारा हिची संतती प्रमाणे आहे.
थोडक्यात मंडळीला मिळालेले तारण हे नियमशास्त्र पालन करून मिळालेले नाही तर प्रभू येशू ख्रिस्ता वरील विश्वासाने कृपेच्या द्वारे मिळालेले आहे, हा त्यातील खोल अर्थ प्रगट होतो.
यावरून बायबलच्या लिखाणामध्ये अनेक पैलू आहेत, हे निश्चित होते.
दुसरे उदाहरण, जुन्या करारातील मलकीसदेक हा प्रभू येशू ख्रिस्ताचा दर्शक होता असे शास्त्रातून दिसून येते. मलकीसदेक या शब्दामध्ये देखील अर्थ दडलेला आहे असे शास्त्रातून दिसून येते.
(इब्री ७:२)
" ‘अब्राहामाने’ त्याला ‘सर्व लुटीचा दशमांश’ दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता. " याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की *बायबल आपल्याला हिब्रू शब्दांच्या अर्थाचा वापर अर्थ विवरणासाठी व उलगड्यासाठी करावा असा संकेत देत आहे.
यहुदी लोकांना दिलेले नियमशास्त्र हे अर्थहीन कर्मकांड म्हणून दिले नव्हते असे बायबल सांगते,
(रोमकरांस पत्र ७ :१४)
"कारण आपल्याला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे ;"
तर त्यामध्ये भविष्यात्मक अर्थ व पुढे होणाऱ्या घटनांची पूर्व छाया दिलेली होती.
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे मानवासाठी तारणाचे महान कार्य पूर्व छायेच्या रूपात दिलेले आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो,
(योहान ५ :३९, ४६)
"तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत;
तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. "
(लूक २४:२७)
"मग त्याने *मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून* आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. "
तिसरे उदाहरण,
उत्पत्तीच्या पुस्तकात वर्णन केलेली आदामाची निर्मिती ही शब्दशः ऐतिहासिक सत्य घटना आहे. पण या घटनेमध्ये आणखीन एक स्तर आहे. आदाम हा ज्या प्रमाणे संपूर्ण मानव जातीचा देह दृष्ट्या संघीय प्रमुख म्हणजे फिजिकली फेडरल हेड होता त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा आत्मिक दृष्ट्या एका आत्मिक प्रजेचा प्रमुख आहे. आदामापासून शारीरिक प्रजा निर्माण होते तसे ख्रिस्तापासून आत्मिक प्रजा निर्माण होते. आदामाची गाढ निद्रा व आणि निद्रेतून जागे होणे व त्याच्या फासळी पासून त्याची पत्नी हवा हिची निर्मिती करण्यात आली. तसेच ख्रिस्ताचे दुःख सहन व पुनरुत्थान यामुळे नवीन कराराच्या मंडळीची स्थापना झाली. म्हणूनच बायबल सांगते,
(रोमकरांस पत्र ५ :१४)
आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. "
अशाप्रकारे बायबलचे लिखाण हे अनेक पैलूंनी समृद्ध आहे.
अशाच प्रकारे बायबलचा आणखीन एक चित्त वेधक व अलौकिक पैलू हिब्रू अक्षराच्या चित्र लिपी मधून दृष्टीस पडतो.
लेखाच्या सुरुवातीस वर्णन केल्याप्रमाणे हिब्रू भाषा हे प्रथम चित्र लिपी स्वरूपात होती.
चित्रलिपीतून प्रगट होणारा एका अद्भुत अर्थाचे स्पष्टीकरण खाली देण्यात येत आहे.
(निर्गम ३:१३-१५)
"तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएल वंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?” देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएल वंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल."
परमेश्वर देव आपले वैयक्तिक नाव यहोवाह किंवा याव्हे आहे असे मोशेला सांगत आहे. या नावाचा अर्थ परमेश्वराने तिथेच सांगितला आहे की "मी जो आहे तो आहे." म्हणजे सर्वकाळ असणारा सनातन असा यहोवा या नावाचा स्पष्ट अर्थ स्वतः देव मोशेला सांगत आहे.
त्यामुळे प्राधान्याने प्रथम स्तरावर यहोवा किंवा याव्हे या शब्दाचा अर्थ "मी जो आहे तो आहे" म्हणजे सर्वदा जिवंत असणारा असाच घेणे अनिवार्य आहे.
पण दुय्यम स्तरावर हिब्रु अक्षरांच्याद्वारे यहोवा या शब्दावर दैवी लिखाणामध्ये अधिकचा प्रकाश पाडलेला आढळतो.
अक्षरांच्या चित्रमय अर्थाकडे आपण आता पाहूया:
यहोवा हा शब्द मुळात चार हिब्रू अक्षरांचा बनलेला आहे.
YHWH
(Yod Hey Vav Hey)
या चार अक्षरांना *lटेट्राग्रॅमॅटन (म्हणजे चार अक्षरे) असे म्हणतात.
या हिब्रू चित्रलिपी शब्दांचा अर्थ खालील प्रमाणे आहे:
१.यॉड (י) Yod : हात
२.हे (ה) Hey : पहा
३.वाव (ו) Vav : खिळा (किंवा हुक)
४.हे (ה) Hey : पहा
उपरोक्त चित्र लिपीप्रमाणे हे खालील प्रमाणे वाचले जाऊ शकते. " हात पहा, खिळा पहा," किंवा " खिळे ठोकलेला हात पहा, " असे वाचले जाऊ शकते.
याचा सरळ भविष्यसूचक संदर्भ आपल्या प्रभू येशूच्या वधस्तंभावर खिळले जाण्याशी येतो हे प्रगट होते.
यावरून खालील अधिकचा सखोल अर्थ प्रकट झालेला आढळतो.
१.प्रभू येशू ख्रिस्त हा यहोवा देव आहे.
२.यामध्ये त्रैकत्वाचा सिद्धांत देखील प्रगट झालेला दिसून येतो कारण पिता स्वतःचे नाव यहोवा हे सांगत आहे. परंतु वधस्तंभावर मात्र पुत्र गेला आणि त्याचे हात खिळले गेले, पित्याचे नव्हे; पण जर पुत्राचे नाव देखील यहोवा आहे आणि देव तर एकच आहे तर निश्चितच या ठिकाणी त्रैक्याची सत्यता दिसून येते.
३.त्रैक्यत्वातील दुसरी व्यक्ती ही देव आहे, आणि देव स्वतः खंडणी भरणार होता किंवा मनुष्यासाठी मरणार होता ही भविष्यात्मक पूर्व छाया देखील यामधून प्रगट होते.
४.देव आत्मा आहे त्यामुळे देव खिळीला जाऊ शकत नाही, म्हणून देव म्हणजे त्रैक्यत्वातील दुसरी व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मानवी देहात येणार होता याची ती एक प्रकारे भविष्यवाणी होती.
योहान २०:२७
" नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.”
अशाप्रकारे बायबलचे लिखाण हे असामान्य अलौकिक दैवी प्रतिभेमधून पवित्र आत्म्याच्याद्वारेच लिहिले गेले आहे त्याला अनेक पैलू आहेत व ते एकमेकांशी सुसंगत आहेत त्यामध्ये विरोधाभास मुळीच नाही, याला दुजोरा मिळतो.
टीप: (उपरोक्त वर्णन केलेला चित्र लिपीचा तक्ता आपल्या माहितीसाठी खाली देण्यात येत आहे. आपण स्वतः पडताळणी करू शकता.)
सर्व मान महिमा गौरव आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देव जो बाप, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा यालाच असो. आमेन.
God bless you.
रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
मोबा.9764158800




Comments